सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शाहांच्या सासरवाडीला; राऊतांचा टोला

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोल्हापूर ही सासरवाडी आहे. त्याच्या सासरवाडीलाच सीमावादाचे सर्वाधिक चटके बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अमित शहा यांनी ठोस भूमिका घ्यावी, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यामांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नात मध्यस्थी ही पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांनी करावी. दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचे आहेत आणि कर्नाटकात सरकारच संपूर्ण भाजपच आहे. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री असे म्हणतात की, अमित शाह यांना भेटून काही फायदा नाही , मात्र आम्ही म्हणतो गृहमंत्र्यांना भेटून फायदा आहे. हा संपूर्ण भाग केंद्रशासित करण्याचा अधिकार हा गृहमंत्र्यांना आहे, असे संजय राऊत म्हणाले.

या सीमाभागामध्ये कर्नाटकचे पोलीस धुडघूस घालत आहेत. तिथे राज्य पोलीस दलाचा फौज फाटा मागे करुन सेंट्रल फोर्स पाठवावी हे केंद्रीय गृहमंत्री करु शकतात. हा संपूर्ण सीमा भाग अल्पसंख्याक खाली येतो. मराठी लोक तिथे मायनॉरिटी खाली येतात. त्यामुळे मराठी भाषा मराठी संस्कृती त्या संदर्भात अधिकारवाणीने आदेश देण्याचे काम हे गृहमंत्र्यांचा आहे. खरंच गृहमंत्री मध्यस्थीचे काम करणार असतील आणि जर यातून सकारात्मक निर्णय होणार असतील तर यावर टीका करण्याचा कारण नाही, असे राऊत म्हणाले.

गृहमंत्र्यांना आमचे आव्हान आहे, गेल्या ७० वर्षांपासून त्या भागातील मराठी माणसावर अन्याय होतोय. त्या संदर्भात तुम्ही निर्णय घ्यावे. गृहमंत्री हे महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहेत आणि आणि सीमा प्रश्न ही सगळ्यात जास्त झळ ही कोल्हापूरला बसते आहे. त्यामुळे या प्रश्न संदर्भात त्यांना जास्त माहिती असणार. न्यायालयात अनेक प्रकरणे आहेत म्हणून केंद्राने हस्तक्षेप करायचा नाही का ? न्यायालय हे राम मंदिराचा प्रश्न सलग सुनावणी लावून सोडू शकते, असा सवाल उपस्थित राऊत यांनी यावेळी केला.

Share