शिंदे गटातील आमदाराकडून आई-बहिणीवरून शिवीगाळ केली – अमोल मिटकरी

मुंबई : राज्य विधिमंडळ पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचीही माहिती आहे. या सगळ्या राड्याविषयी आमदार अमोल मिटकरी यांनी आपली बाजू मांडत महेश शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना मिटकरी म्हणाले की, आज सत्ताधारी पक्ष विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. काल महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बैठक झाली होती. सध्याच्या घडीला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यासाठी मविआचे सर्व आमदार विधानभवन परिसरात जमा झाले होते. आम्ही आंदोलन करत असताना शिंदे गटातील एका शिंदे नावाच्या आमदाराने धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला आई-बहिणींवरून शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. आम्ही महाराष्ट्राची संस्कृती जपणारे लोकं आहोत, पवारसाहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आम्ही कधीही विसरणार नाही.

अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, “विरोधीपक्ष म्हणून सरकारला जाब विचारणं, हे आमचं काम आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? आम्ही “५० खोके, एकदम ओक्के” बोललो की यांच्या जिव्हारी लागतं. तेही आम्हाला बेईमान वगैरे म्हणातात. अशा प्रकारे टीका करण्याचा अधिकार त्यांना आणि आम्हालाही आहे. पण आंदोलन करत असताना ते मारहाण करत असतील आणि आई-बहिणींवरून शिवीगाळ करत असतील तर, ही बाब महाराष्ट्राला अशोभनीय आहे.

Share