औरंगाबादमध्ये आणखी एक हत्या, काम ऐकत नाही म्हणून पतीनेच केला पत्नीचा खुन

औरंगाबाद : काम ऐकत नाही, कोणतीही गोष्ट मनासारखी करत नाही म्हणून पतीनेच पत्नीचा उशीने तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील भावसिंगपुरा भागात काल दि.३० रोजी घडली आहे. या घटनेनंतर पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. मधुरा बालाजी लोणीकर (वय २२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर, बालाजी वैजीनाथ लोणीकर (वय २९, मुळ रा. परळी वैजीनाथ, जि. बीड, ह. मु. भानुदासनगर) असे आरोपी पतीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी,  लोणीकर दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून औरंगाबादेतील भानुदासनगर येथे किरायाच्या घरात वास्तव्यास होते. आरोपी बालाजी हा खासगी कंपनीच्या वाहनावर चालक म्हणून कामाला आहे. मधुरा आणि बालाजी यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक तीन वर्षीय मुलगा आहे. मधुरा मनासारखं वागत नाही. सांगितलेले काम ऐकत नाही, असे बालाजीला वाटायचे त्यामुळे नेहमीच दोघांचे खटके उडायचे. काल देखील दोघांमध्ये वाद झाला. यावेळी बालाजीने आपल्या मुलाला पैसे देऊन चॉकलेट आणण्यासाठी बाहेर पाठविले. त्यानंतर त्याने उशीने मधुराचे तोंड दाबून तिची हत्या केली. घटनेची माहीत प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी बालाजीला अटक केली. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.

Share