प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दुपारी त्या भाजप कार्यालयात आल्या होत्या. त्यानंतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपची वाट धरली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. त्याआधी अनुराधा पौडवाल यांचा भाजपप्रवेश झाला आहे. पौडवाल भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवतील का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. पौडवाल या प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांची गाणे आजही लोकांचा पसंतीस पडतात.
कोण आहेत अनुराधा पौडवाल?
अनुराधा पौडवाल , माहेरच्या अलका नाडकर्णी या मराठी गायिका आहेत. यांनी मराठीसह हिंदी, तमिळ, उडिया, नेपाळी इत्यादी भाषांतील चित्रपटांतूनही पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९७३ सालच्या अभिमान नावाच्या हिंदी चित्रपटातील एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचे पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झाले. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या यशोदा या मराठी चित्रपटाद्वारे प्रमुख पार्श्वगायिकेच्या रूपात त्यांची कला प्रथमच श्रोत्यांसमोर आली. तेव्हापासून आतापावेतो सुमारे चार दशके चित्रपटगीते, भावगीते व भजनांच्या ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमांतून या गायन करीत आहेत. अनुराधा पौडवाल या गीत गायनामधून त्यांना मिळालेल्या पैशांचा उपयोग युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी, गरिबांच्या घरांना विजेची जोडणी करून देण्यासाठी आणि कुपोषणाच्या समस्येचे अल्पतः निवारण करण्यासाठी करतात. इंग्लंडमधील इंडो-ब्रिटिश अाॅल पार्टी या संसदीय गटाने इंग्लंडच्या संसदेमध्ये अनुराधा पौडवाल यांचा, त्यांच्या संगीत कारकीर्दीबद्दल आणि समाजकार्याबद्दल गौरव केला.