मुंबईः राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. मात्र, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे अभिभाषण पूर्ण न वाचता संयुक्त सभागृहातून निघून गेले. अभिभाषणाच्या सुरुवातीला सत्ताधारी आमदारांनी उस्फूर्तपणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. मात्र त्यानंतर विरोधकांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊदचे फलक विधिमंडळाच्या सभागृहात झळकवले. या गदारोळातच राज्यपालांनी अभिभाषणातला तिसरा मुद्दा न वाचताच काढता पाय घेतला. या तिसर्या मुद्द्यात महाराष्ट्र सरकारने कर्नाटक राज्यात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आणि बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना याबाबत निषेध व्यक्त केला होता. हा मुद्दा न वाचताच राज्यपालांनी भाषण आटोपते घेतले. त्यामुळे हे राज्यपाल महाराष्ट्राचे आहेत की कर्नाटकचे? असा आरोप राष्ट्रवादीचे विधान परिषदेतले आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान केला होता. त्यामुळे राज्यपालपदावर राहण्याचा त्यांना कुठलाही नैतिक अधिकार राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांचा व भारतीय जनता पक्षाचा जाहीर निषेध त्यांनी व्यक्त केला.
राज्यपालांच्या अभिभाषणातील तिसरा मुद्दा भाजपच्या अंगलट येत होता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्या सांगण्यावरून भाजपचे समर्थक असलेले राज्यपाल तिसऱ्या मुद्द्याचे वाचन न करता निघाले, तिसऱ्या मुद्द्याच्या वाचनाच्य़ा वेळी भाजप आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला, असा स्पष्ट आरोप मिटकरी यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारमधील घटक या नात्याने राज्यपालांना माझी विनंती आहे की, नैतिकता शिल्लक असेल आणि देशाबद्दल आस्था असेल तर आपल्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी आज महाविका आघाडी सरकार त्यांना जाब विचारणार होती. मात्र ऐन वेळी त्यांनी पळ काढला ही लाजिरवाणी बाब असल्याचे मिटकरी म्हणाले. तसेच अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी राज्यपालांचा राजीनामा मागितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.