राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, काय आहे प्रकरण?

सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे हटविण्यासंदर्भात घेतलेल्या भुमिकेमुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच आता सांगलीतील शिराळा कोर्टाकडून राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या विरोधात शिराळा कोर्टाने वॉरंट काढलं आहे. हे वॉरंट २०१२ मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण १० वर्षे जुनं आहे. ६ एप्रिल रोजी वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीच कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल कोर्टाने पोलिसांना विचारला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सांगली जिल्ह्यात मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी जवळ आंदोलन करून दुकानांची तोडफोड केली होती. यानंतर याबाबतचा गुन्हा शिराळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे जिल्हाअध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासहित अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल आहे. या खटल्यामध्ये राज ठाकरे यापूर्वी एकदा न्यायालयात हजर देखील झाले होते. मात्र पुढील तारखांना गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने आता राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट काढलं आहे.

Share