संजय राऊत यांच्याविरोधात अटक वाॅरट जारी

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मुंबईतील शिवडी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचारचा आरोप केला होता. यावेळी संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांचाही उल्लेख केला होता. याच आरोपांप्रकरणी सोमय्या कोर्टात गेल्याची माहिती समोर आली होती. संजय राऊत यांनी आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले अशी तक्रार मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात केली होती. त्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राऊत हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

संजय राऊत यांचा नेमका आरोप काय?

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. त्यापैकी १६ शौचालये बांधण्याचं कंत्राट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाल्याचा दावा राऊत यांनी केला होता. मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे खोटे कागदपत्रे दाखल करुन फसवणूक करण्यात आली. त्यातून साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिले घेतल्याचा सोमय्या यांनी केला होता.

विशेष म्हणजे संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मुद्दा मांडला होता. त्यानंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. संबंधित आरोपांप्रकरणी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. त्यानंतर शिवडी कोर्टाकडून राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. पण राऊत कोर्टात हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात जामीनपत्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

Share