औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला, त्याला कोणीही हलवू शकत नाही- चंद्रकात खैरे

औरंगाबाद : १ मे रोजी महाराष्ट्रदिनी औरंगाबादेत जाहीर सभा घेण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यानंतर माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘मुंबई, ठाण्यानंतर औरंगाबाद हा शिवसेनेचा मजबूत गड आहे. त्यामुळे या गडाला धक्का देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हा गड अत्यंत मजबूत असून त्याला आता कुणीही हलवू शकत नाही.’

पुढे बोलताना ते म्हणाले, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, याच मैदानावर १९८८ मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी ऐतिहासिक सभा घेतली होती. त्यावेळी सभेत खुर्च्याही नव्हत्या. लोक खाली बसले होते. लाखोंच्या संख्येने या मैदानावर लोकांनी बाळासाहेबांना ऐकण्यासाठी गर्दी केली होती. या सभेनंतर मीच माझ्या पुर्वीच्या सभेचा रेकॉर्ड तोडला, असे उद्गार त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी काढले होते, अशी आठवण खैरे यांनी सांगितली. तसेच, या सभेनंतरच औरंगाबाद पालिकेत शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून गेले होते व हा जिल्हादेखील शिवसेनेचा गड बनला होता, असे खैरे यांनी सांगितले.

Share