औरंगाबाद : महापालिकेचा कारभार स्मार्ट व्हावा, या दृष्टीने महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मदतीने ‘नागरिक मोबाईल अॅप’ तयार केले आहे. या अॅपमुळे नागरिकांना एका क्लिकवर मालमत्ता कर भरता येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना त्यांच्या समस्यांची नोंद देखील करता येतील. उद्या, मंगळवार (२६ एप्रिल) पासून हे अॅप नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
शहरातील मालमत्तांचे आणि नळ जोडण्याचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे दोन लाख ८० हजार मालमत्तांचे आणि एक लाख वीस हजार नळ जोडण्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते अपलोड करण्यात आले आहे. त्याशिवाय महापालिकेचा कारभार पेपरलेस व्हावा यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. या कामासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची मदत घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्मार्ट नागरिक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे.
अॅपमधील एका बटनावर क्लिक करून नागरिकांना त्यांच्या मालमत्ताकर आणि पाणीपट्टीबद्दल माहिती मिळेल. त्याच बरोबर क्लिक केलेल्या बटनाच्या आधारे करदेखील भरता येणार आहे. महापालिकेतर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती आणि या सेवांचा लाभ घेण्यासाठी अॅपवर दुसरे बटन देण्यात आले आहे. महापालिकेशी संपर्क साधण्यासाठी अॅपवरील तिसरे बटन काम करणार आहे. नागरिकांच्या तक्रारी – अडचणींची नोंद करण्यासाठी देखील अॅपवर एक स्वतंत्र बटन देण्यात आले आहे. यामुळे कर भरण्याबरोबरच आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी नागरिकांना एका क्लिकचा वापर करता येणार आहे. एका क्लिकवर स्मार्ट नागरिक बनवण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे.