आजादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा चित्ररथाला हिरवी झेंडी

नागपुर : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आजादी का अमृत महोत्‍सव, हर घर तिरंगा, कोविड बुस्टर लसीकरण चित्ररथाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती संचालक हेमराज बागुल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपजिल्‍हाधिकारी हेमा बडे, जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, केंद्रीय संचार ब्‍यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत, जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधकिारी अंकुश गावंडे, तहसीलदार मृदुला मोरे, श्रीराम मुंदडा प्रामुख्याने उपस्थित होते.

१३ ते १५ ऑगस्टपर्यंत मोहिम 

ही मोहीम नागपूर जिल्हा व शहरात १५ ऑगस्‍ट, २०२२ पर्यंत राबविण्‍यात येणार आहे. या मोहीमेत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणा-या हर घर तिरंगा मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तिरंगा फडकवितांना नागरिकांनी काय करावे व काय करू नये, याबाबत केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे (महाराष्ट्र आणि गोवा) आणि जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर यांनी तयार केलेल्या ऑडीयो क्लिपद्वारे नागरीकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तसेच नागरिकांनी कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी बुस्टर लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चित्ररथ प्रत्येक तालुक्यात फिरणार 

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभक्ती गीताद्वारे जनजागरण करण्यात येणार आहे. हे चित्ररथ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फिरणार आहे. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखील देशमुख, सहायक संचालक हंसराज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय संचार ब्युरो, नागपूरचे तांत्रिक सहायक संजय तिवारी, संजीवनी निमखेडकर, नरेश गच्छकाय यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Share