बाळासाहेबांचा विश्वासू चंपासिंह थापाही शिंदेंच्या गळाला…

ठाणे : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून आमदार, खासदारांनी शिंदे गटाची वाट निवडली आहे. आता बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांचे सर्वात विश्वासू अशी चंपासिंह थापा अशी ओळख आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,  थापांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वांच्या विचारांना पाठिंबा दिला, समर्थन दिल्याचं सांगितलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जे सावली सारखे राहिले, ते चंपासिंग थापाही शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यांनी मला सांगितलं, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाताय, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाताय, जी गोष्ट २०१९ ला व्हायला नको होती, ती गोष्ट तुम्ही करताय, त्यामुळे बाळासाहेबांचे विचार जो कोणी पुढे नेत असले त्यांच्यासोबत हा थापा राहिल असं मुख्यमंत्री म्हणाले

कोण आहेत चंपासिंग थापा?
चंपासिंग थापा ३० वर्षांपूर्वी नेपाळहून भारतात आले. मुंबईच्या गोरेगावमध्ये राहून त्यांनी पोटापाण्यासाठी छोटी-मोठी कामं करायला सुरूवात केली. भांडूपचे नगरसेवक के.टी.थापा यांच्या ओळखीने चंपासिंग थापा यांना मातोश्रीवर प्रवेश मिळाला आणि काही काळातच थापा बाळासाहेबांचा लाडका झाला.

बाळासाहेब ठाकरे यांचं जेवण, औषधांच्या वेळा यासारख्या रोजच्या गोष्टींवर थापा लक्ष ठेवून असायचा. मांसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेब आणखीनच हळवे झाले होते, तेव्हा थापाने बाळासाहेबांची जीवापाड काळजी घेतली.

मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीशेजारीच थापाचीही छोटीशी खोली होती. थापाचं कुटुंब नेपाळमध्ये तर दोन मुलं दुबईमध्ये असतात. मुंबईसह महाराष्ट्रात झालेली शिवेसनेची वाढ, भुजबळ, राणे यांनी केलेलं बंड तसंच राज ठाकरेंनी सोडलेली साथ असो, या सगळ्या काळात थापा बाळासाहेबांच्या कायमच जवळ राहिला.

Share