नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ४०४१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच गुरुवारी दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही मार्च महिन्यानंतर देशात झालेली सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. देशात ११ मार्चनंतर सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांवरून चार हजारांवर पोहोचली आहे. आधीच्या दिवशी देशात ३७१२ नवीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज हा आकडा चार हजारांवर पोहोचला आहे.
देशात कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २० हजार १७७ एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांची दर ०.०५ टक्के आहे. तर देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७४ टक्के आहे. गुरुवारी दिवसभरात २ हजार ३६३ रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत १० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४ लाख २५ हजार ३७९ नमुने तपासण्यात आले आहेत. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत १९३ कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात आढळले सर्वाधिक रुग्ण…
गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक नवे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात १०४५, दिल्लीमध्ये ३७३, तामिळनाडू १४५, तेलंगणात ६७, गुजरातमध्ये ५० तर मध्य प्रदेशमध्ये २५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.