मनसे हा घराघरापर्यंत पोहोचेल इतका मोठा पक्ष नाही : जयंत पाटील

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले होते. मनसैनिकांनी हे पत्रक घराघरापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. यानंतर आता राष्ट्रवादी काॅँग्रेस पक्षाने मनसेवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक शब्दांत टिका केली आहे.

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. मनसैनिकांनी हे पत्रक घराघरापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. यावरून जयंत पाटील यांनी मनसेला डिवचले आहे. राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष घराघरापर्यंत पोहोचेल इतका काही मोठा नाही. त्यांनी जे पत्रक काढले आहे, ते कुठपर्यंत पोहोचते, त्याला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, हे पाहून बोलेन, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मशिदींवरील भोंग्यांच्या विषय मनसेनेने उचलल्यानंतर राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकारण ढवळून निघाले. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकांसाठी दोन पानी पत्र तयार केले आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे पत्र घरोघरी पोहचविण्याची मोहीम आखण्यात आली आहे. भोंग्यांविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून राज ठाकरे यांनी हे पत्र लिहिले आहे. स्वाक्षरी मोहीम, भोंग्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार करणे अशा माध्यमातून अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज यांनी या पत्रात केले आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषेत हे पत्र तयार करण्यात आले आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हे पत्र घराघरांत पाठवण्याची सूचना करताना कोणीही यात कुचराई करू नये, असा सज्जड दमही राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज ठाकरेंच्या पत्रकात नेमकं काय?

१. जिथे-जिथे आवाजाच्या नियमाचे पालन होत नसेल तिथे-तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलिसांना कळवावे.

२. लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वतःच्या मोबाईलवरून १०० क्रमांक डायल करून पोलिसांना सतत माहिती देऊ शकता.

३. माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, त्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कोणत्याही संकटात, अडीअडचणीच्या वेळी माझा हा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी धावून येईल.

Share