शिवसेनाला मोठा धक्का; दोन माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन माजी आमदारांनी भाजपात प्रवेश केलाय. बोईसरचे माजी आमदार विलास तसेच पालघरचे शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे त्यांनी भाजप प्रवेश केलाय.

कोण आहेत विलास तरे?
माजी आमदार असलेल्या या दोघांनीही पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यातील विलास तरे हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २००९ आणि २०१४ साली विलास तरे हे बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभेवर निवडून आले होते. दरम्यान, २०१९ मध्ये निवडणुकीआधी तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

शिवसेनेच्या पालघरमधील अंतर्गत वादामुळे तरे यांचा पराभव झाला, असं बोललं जातं. बोईसर विधानसभा मतदारसंघातून २०१९ साली निवडणूक लढवताना विलास तरे यांना हार पत्करावी लागली. तेव्हापासून तरे अस्वस्थ होते आणि ते शिंदे गटात जातील, अशी चर्चा सुरु होती.

कोण आहेत अमित घोडा?
दुसरीकडे शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा हे दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांचे सुपुत्र आहे. ते २०१६ साली झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून पालघर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. पण २०१९ साली विधानसभा निवडणुकीसााठी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती.

अमित घोडा आणि विलास तरे यांची भाजपात प्रवेश केल्यानं पालघरमध्ये भाजपचं बळ वाढलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पालिका निवडणुकांच्या आधी घडलेला हा पक्षप्रवेश मोठी राजकाय घडामोड मानला जातोय. या पक्षप्रवेशाने शिवसेनेसोबत शिंदे गटालाही धक्का दिल्याचं जाणकारांचं म्हणणंय.

Share