भाजपला एकनाथ शिंदे पण नको आहेत; आंबेडकरांचं मोठं विधान

मुंबई : भाजपला ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे  नको होते, त्याच पध्दतीनं एकनाथ शिंदे सुद्धा त्यांना नको असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुखप्रकाश आंबेडकर यांनी केलं. ते यवतमाळमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले,सध्या जे राज्यात चाललं आहे ते राजकारणाच्या दृष्टीनं योग्य नाही असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. ही काही गादीची लढाई नाही. मतदार हा राजा आहे. त्या राजाला कोणाला बसवासं वाटतं तो त्याला बसवेल. तो निर्णय आनंदानं स्विकारावा असेही आंबेडकर म्हणाले. ज्याप्रमाणे भाजपला उद्धव ठाकरे हे नको होते, तसेच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नको आहेत असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. हे बॅगेज त्यांना बाहेर काढायचे आहे. त्यांना परिस्थिती अनुकूल दिसली तरच एकनाथ शिंदे यांना निवडणुकांमध्ये सोबत घेतील असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांची युती होते का हे पाहावं लागेल असेही ते म्हणाले.

अंधेरी पोटनिवडणुकीत वंचितचा कोणाला पाठिंबा?
सध्या अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीसंदर्भात देखील प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, या निवडणुकीसंदर्भात आम्ही वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहोत. ही निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी महत्वाची आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार असल्यानं त्याला पाठिंबा देण्याचा विषय नाही. आमच्याकडे अद्याप कोणीही पाठिंबा मागितला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. सुप्रीम कोर्टाने जे अनियंत्रित अधिकार निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याचं काय होऊ शकत याची माहिती मी लोकांसमोर मांडली होती असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

Share