कोकणात ठाकरेंना लवकरच आणखी धक्के बसतील – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : श्रीवर्धनचे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी शुक्रवारी भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय ठाकरे गटाच्या  मीरा भाईंदरमधील तीन नगरसेवकांनीही भाजपचा झेंडा हातात घेतला. तसेच एका काँग्रेस नगरसेवकानेही भाजपमध्ये प्रवेश केला.

अवधूत हे २०१४ मध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे आमदार होते. त्यापूर्वी ते रोह्याचे नगराध्यक्षही होते. २०१९ मध्ये ते शिवसेनेत गेले. पण, त्यांच्याऐवजी विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली होती. सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती या सध्या श्रीवर्धनच्या आमदार आहेत. बावनकुळे यांनी यावेळी, कोकणात ठाकरेंना लवकरच आणखी धक्के बसतील, असा दावा केला.

२०१४ च्या पेण विधानसभा निवडणुकीत खा. सुनील तटकरे यांचे थोरले बंधू आणि अवधूत तटकरे यांचे वडील अनिल तटकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असतानाही पेणमधून आघाडीच्या विरोधात निवडणूक लढविली होती. या उमेदवारीमुळे झालेल्या मतविभागणीचा फटका बसून आघाडीचे उमेदवार माजी मंत्री रवींद्र पाटील यांचा पराभव झाला होता. त्यावेळी कौटुंबिक वाद झाल्याचा आरोप रवी पाटील यांनी केला होता.
Share