माधव पिटले/ निलंगा : हिम्मत असेल तर राज्यात नव्हे तर केळव लातूर जिल्ह्यात काॅंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी असे थेट आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे.
निलंगा तालूक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा काल मुंबई येथे काॅँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लातूरसह मराठवाडा भाजप मुक्त करण्याचा पॅटर्न निर्माण करण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केले होते. एवढेच नाहीतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले. पटोले यांच्या भाजप मुक्त पॅटर्न आणि स्वबळाच्या विधानावर माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पलटवार केला असून नाना भाऊ तुम्ही राज्यात सोडा फक्त लातूर जिल्ह्यात तरी स्वबळावर निवडणूका लढवून दाखवा असे आव्हान केले असून भाजप आणि काँग्रेसचे नेते मंडळी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकापूर्वी एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत.येणाऱ्या काळात कोण कोणावर भारी पडणार हे येणारा काळच सांगणार आहे.
पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांनी नव्या घरी तरी सुखाने नांदावे त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत. नव्या घरची सासू कडक असून नवऱ्याची भेट होणे मुश्कील होणे अवघड असल्याने संसार कसा थाटणार हे लवकरच जनतेला दिसणार असल्याची मिश्कील टिप्पणी त्यांनी यावेळी केली.राजकारणात हे तर होतच असते याला न जुमानता आपण पक्षाने दिलेली जबाबदारी व पक्षवाढ करणे हेच आमचे ध्येय आहे असे त्यानी शेवटी सांगितले.