मुस्लिम कार्यकर्ता असेल तर त्याचा दाऊदशी संबंध जोडला जातो – शरद पवार

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्ड दाऊदशी कथित संबंध असल्याच्या आरोपांवरून ईडीने अटक केली.  त्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अटक करण्यात आली आहे. गेल्या २० वर्षे नवाब मलिक महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत. त्याकाळ हे सर्व दिसले नाही. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याला दाऊदाचा जोडीदार म्हटले जाते. कारण नसताना आरोप केले जात आहेत. मला त्याची चिंता नाही कारण कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले होते. हे लोक एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे जूने सहकारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला हे माझ्या पाहण्यात आलं नाही. म्हणजे एक न्याय राणेंना लावता अन् दुसरा न्याय मलिकांना लावता याचा अर्थ हा सर्व राजकीय उद्देशाने सुरू केलेला उद्योग आहे. त्यामुळे उद्या पंतप्रधान पुण्यात येतील तेव्हा ते कदाचित याचा खुलासा करतील”,असा टोलाही शरद पवारांनी लगावला आहे.

Share