भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला भीषण अपघात

सातारा : साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात गाडी पुलावरून ३० फूट खोल खड्ड्यात गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, फलटण येथील बानगंगा नदीच्या पुलावरून जाताना आमदार जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर ही कार सुमारे ३० फूट ऊंच असेलल्या पुलावरून खाली कोसळली. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावर लावण्यात आलेल्या तारा तोडून खाली कोसळली असल्याचे समजते. गाडीमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. अपघातात जखमी झालेल्या आमदार गोरे यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, जयकुमार गोरे आणि त्यांचा सुरक्षारक्षक किरकोळ जखमी आहेत. दोघांवरही फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जयकुमार गोरे यांची गाडी खड्ड्याबाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

Share