भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे देशाचं राजकारण नासलं – मुख्यमंत्री

मुंबई-  मी पुन्हा येईन म्हणायचं आणि यायचंच नाही हे वाईट आहे. त्यापेक्षा पुन्हा येईन न म्हणता येण्यात गंमत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. दैनिक लोकसत्ताच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,  केंद्र वि. राज्य संघर्ष, भाजपचं राजकारण, शिवसेनेची वाटचाल यावर ठाकरेंनी सविस्तर भाष्य केलं. दरम्यान, सत्ता मिळवा पण ती लोकशाहीच्या मार्गाने मिळवावी. सगळं काही मलाच पाहिजे, सत्तेचा दुरुपयोग करुन पुन्हा सत्ता मिळवण्याच्या वृत्तीमुळे देशाचं राजकारण नासवलं आहे. हा सत्तापिपासूपणा जो काही आहे त्यामुळे केंद्र आणि राज्यांचे संबंध बिघडत आहेत अशी टीकाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

यापुढे भाजपसोबत युती करणार का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. आता ज्या दिशेनं भाजपची वाटचाल सुरू आहे, जे काही राजकारण चाललं आहे, त्यात काही सुधारणा होणार आहे का, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. भाजपसोबतची युती वैचारिक होती. एक वैचारिक पातळी होती. आता ती पातळी कुठेतरी पाताळात गेली आहे. त्यांना कोणासोबतही युती केली. त्यांचाच कित्ता मग आम्ही गिरवला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या आठवड्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव मुंबईत येऊन गेले. त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा झाली. केंद्र विरुद्ध राज्य संघर्षावर आम्ही बोललो. पण त्यात कुठेही कोणाचा द्वेष नव्हता. कारण आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे. सगळे एकत्र आले तर पुढे काय ते बघू, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्याचं हित लक्षात घेऊन निर्णय घेतला. आता देशाच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेऊ, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

Share