केंद्र सरकारच्या कारवाया राजकीय सूडभावनेतून – जयंत पाटील

मुंबई : महाराष्ट्रात ज्या सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय त्याविरोधात राज्यात आणि देशात जनभावना तीव्र आहे. जनता याबाबत नापसंती व्यक्त करत असून राजकीय सूडभावनेची कारवाई भाजपालाही न परवडण्यासारखी आहे, असा टोला  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला  आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज केंद्रीय सत्ताधाऱ्यांच्या सुडाच्या राजकारणाविरोधात मुंबईच्या चेंबुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नवाब मलिक यांना सार्वजनिक जीवनात तीस वर्षे घालवली आहेत. त्यांच्यावर झालेली कारवाई केवळ ते केंद्र सरकारविरोधात बोलत असल्यामुळे होत आहे. यासाठी नवाब मलिक यांचा आतंकवादाशी संबंध लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

 

ईडी, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणा ज्याप्रकारे काम करत आहेत, या सर्व कारवाई सुडाच्या भावनेतूनच होत असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे. महाविकास आघाडी सरकारने या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच काही लोक षडयंत्र रचून राज्यातील प्रमुख नेत्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आजपासून राज्यभरात महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्यावतीने आंदोलने करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Share