औरंगाबादमधील कन्नड येथे आढळला बॉम्ब, नागरिकांमध्ये दहशत

औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड शहरात आज सकाळी बॉम्ब सदृश वस्तु आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. एका फर्निचर दुकानाबाहेर ही वस्तु आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. तसेच मोठा गोंधळ उडाला होता. अखेर बॉम्बनाशक पथकाने घटनास्थळी जाऊन बॉम्ब निकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली.

याबाबत अधिक माहिती अशी, कन्नड येथील एका फर्निचर दुकानदाराने नेहमीप्रमाणे सकाळी आपली दुकान उघडली. यावेळी त्यांना दुकानाजवळ एक मोबाईलचा बॉक्स आढळला. त्यांनी हा बॉक्स उघडून पाहिला असता त्यात बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे दिसले. हे पाहून त्याना घामच फुटला. त्यांनी लगेच आरडाओरड करत आजुबाजुच्यांना सावध केले. आणि पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला. त्यानंतर याची माहिती बॉम्ब शोधक व नाशक पथकाला देण्यात आली. त्यांनीही तात्काळ घटनास्थळी दाखल होत बॉम्ब निकामी केला. आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

या घटनेत कुठलीही हानी झाली नाही. मात्र, याठिकाणी बॉम्ब ठेवला कोणी? तो ठेवण्यामागचा नेमका हेतू काय? हा एकच बॉम्ब होता की आणखी कुठे ठेवलेला आहे? आणि हा बॉम्ब बनवला कसा? याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान सध्या पोलीसांसमोर आहे.

Share