मंदीरात गेल्यानं मागासवर्गीय समाजावर बहिष्कार

लातूर : पुरोगामी महाराष्ट्रात २१ व्या शतकातही विचार अजूनही जातीच्या विळख्यात गुंतलेली आहेत. निलंगा येथील ताडमुगळी गावात मागासवर्गीय असलेल्या कुटुंबातील तरुणानं गावच्या देवळात नारळ फोडला म्हणून बहिष्कार टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

तीन दिवसांपूर्वी गावातील मागासवर्गीय समाजातील तरुणाने मंदिर प्रवेश केल्याने गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मागासवर्गीय समाजाने मंदिराच्या बाहेरुन दर्शन घ्यावे ही प्रथा गावात होती. ही प्रथा मोडल्यामुळे समाजात तेढ निर्माण झाला. यामुळे गावातील संपूर्ण मागासवर्गीय सामाजावर बहिष्कार टाकण्यात आला.

या घटनेनंतर गावातील नागरिकांनी या समाजासाठी गावातील दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तुंवर बंदी घालण्यात आली आहे . शेतातील मजूरीसाठी बोलावने बंद करण्यात आलं. दोन दिवसांत याची चर्चा पोलिसांपर्यंत गेली. औराद शहाजानी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गावात सर्वप्रथम पोलीस बंदोबस्त लावला. सर्वाशी चर्चा करत प्रकरण तुर्तास तरी मिटवले आहे.

Share