पोटनिवडणूक निकाल : उत्तर प्रदेशमध्ये सपच्या बालेकिल्ल्याला भाजपचा सुरुंग

नवी दिल्ली : देशामधील सहा राज्यांतील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. आज या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रामपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार घनश्याम सिंह लोधी हे विजयी झाले आहेत. घनश्याम सिंह लोधी यांनी समाजवादी पक्षाचे आमदार असीम राजा यांचा पराभव केला आहे.

दुसरीकडे दिल्लीतील राजेंद्रनगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार दुर्गेश पाठक विजयी झाले आहेत. पाठक यांनी ११ हजार ५५५ मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. त्रिपुरा विधानसभा पोटनिवडणुकीत त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा टाऊन बारडोवली मतदारसंघातून विजयी झाले आहेत. माणिक सहा यांना काँग्रेसच्या आशिष कुमार साहा यांचे आव्हान होते. मात्र, या निवडणुकीत माणिक साहा यांनी आशिष साहा यांचा ६,१०४ मतांनी पराभव करत विजय मिळवला. मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी माणिक सहा यांना विजय मिळवणे गरजेचे होते.

पंजाबमध्ये आपला शिरोमणी अकाली दलाचा झटका
पंजाबमधील संगरुर लोकसभा मतदानसंघात शिरोमणी अकाली दलच्या सिमरनजीत सिंह मान यांनी विजय मिळवला आहे. यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आम आदमी पक्षाचे एकमेव खासदार होते. भगवंत मान यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दल (अमृतसर) अध्यक्ष सिमरजीत सिंह मान यांनी विजय मिळवला. सिमरनजीत सिंह मान यांनी आपचे उमेदवार गुरमैल सिंह यांचा ६२४५ मतांनी पराभव केला आहे. या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या गावातही आम आदमी पक्षाला कमी मते मिळाली. या पोटनिवडणुकीत काँग्रेस तिसऱ्या, भाजप चौथ्या आणि शिरोमणी अकाली दल (बादल) पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. सिमरजीत सिंह मान हे भारतीय पोलिस दलातील माजी अधिकारी आहेत. ऑपरेशन ब्लू स्टारच्या विरोधात त्यांनी १९८४ सााली प्रशासकीय सेवेतून राजीनामा दिला होता. ते यापूर्वी १९८९ आणि १९९९ साली तरतारण आणि संगरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

भगवंत मान यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर संगरुर लोकसभेची जागा रिक्त होती, तर दिल्लीतील राजेंद्रनगर विधानसभेची पोटनिवडणूकही घेण्यात आली. आपचे राघव चड्ढा राज्यसभेवर गेल्याने ते पद रिक्त झाले होते. त्रिपुरामध्ये आगरतळा, टाउन बारडोवाली, सुरमा आणि जुबराजनगर या चार विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. तसेच आंध्र प्रदेशातील आत्मकुरू, झारखंडमधील मंदार विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.

उत्तर प्रदेशमधील आझमगड आणि रामपूरमध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा कमी मतदान झाले. आझमगडमध्ये ४८.५८ टक्के तर रामपूरमध्ये केवळ ३९.०२ टक्के मतदान नोंदवण्यात आले. पंजाबमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत मतदारांचा उत्साह दिसून आला नाही. तिथे केवळ ३६.४० टक्के मतदान झाले, तर दिल्ली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत केवळ ४३.७५ टक्के मतदान झाले आहे.

Share