पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना सीबीआयकडून अटक

पुणे : येस बॅंक आणि डीएचएफएल बॅंक घोटाळा प्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना आज गुरुवारी सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. येस बॅंक आणि डीएचएफएल बॅंक गैरव्यवहार प्रकरणात तीनशे कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी अविनाश भोसले यांना सीबीआयने गुरुवारी सायंकाळी भोसले यांच्या घरातून अटक केली आहे.

अनेक राजकीय नेत्यांशी तसेच व्यावसायिकांशी जवळचे संबंध असणारे अविनाश भोसले हे एबीआयल ग्रुपचे मालक आहेत. ‘रिअल इस्टेट किंग’ अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. काही दिवसांपूर्वी अविनाश भोसले आणि मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक विनोद गोएंका आणि शाहिद बलवा यांच्यासह आणखी दोन व्यावसायिकांशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयने छापा टाकला होता. त्यानंतर आज अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. या प्रकरणात यापूर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे. दरम्यान, याच बॅंक गैरव्यवहार प्रकरणामध्ये बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार सीबीआयकडून भोसले यांचा तपास सुरू होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिल महिन्यात सीबीआयने छापे टाकून काही मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती. त्याचवेळी महत्वाची कागदपत्रेही सीबीआयने जप्त केली होती, तर मागील वर्षी सीबीआयने त्यांची तब्बल ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. अविनाश भोसले यांच्यावर ईडीने गेल्या वर्षी कारवाई केली होती. भोसले यांची ४० कोटींची संपत्ती गेल्या वर्षी जूनमध्ये जप्त करण्यात आली होती. भोसले यांच्या व्यावसायिक भागीदारांवरदेखील छापे टाकण्यात आले होते.

अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, उद्योजक असून त्यांचा मुंबई व पुण्यात बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. पुणे शहरातील भोसलेनगर व डेक्कन जिमखाना परिसरात त्यांची प्रशस्त कार्यालये आहेत, तर पाषाणमध्ये येथे भोसले यांचे आलिशान निवासस्थान आहे. भोसले यांना यापूर्वीही विदेशातून कर चुकवून मौल्यवान चीजवस्तू घेऊन येताना सीमाशुल्क विभागाने विमानतळावर ताब्यात घेतले होते. अविनाश भोसले यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून पुण्यासह राज्यातील विविध भागांत ओळख आहे. तसेच व्यवसायासोबतच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही भोसले चर्चेत असतात. काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. अविनाश भोसले यांना आज सीबीआयने अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Share