चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचे सर्वात मोठे गिफ्ट सायंकाळपर्यंत मिळेल

मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्यासाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या आमदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली. त्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक शब्दांत टिका केली आहे.

अमोल मिटकरी आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात, भाजप कडून खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये कुठलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीचे राज्यसभेचे सर्व उमेदवार निवडून येतील. चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचे हे सर्वात मोठे गिफ्ट सायंकाळपर्यंत मिळेल, असे ट्वीट मिटकरी यांनी केले आहे.

दरम्यान, सर्वच पक्षांकडून गटागटाने आमदार विधानभवनात येऊन मतदान केले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मतांचा कोटा ४२ वरून ४४ केल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, शिवसेनेच्या नाराजीनंतर त्यांनी पुन्हा निर्णय बदलून तो ४२ केल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली होती. आकडेवारीनुसार, काँग्रेसकडे दोन, राष्ट्रवादीकडे ९ तर शिवसेनेकडे १३ अतिरिक्त मते आहेत. शिवाय चार अपक्ष आमदारही सरकारच्या बाजूने मत देण्याची शक्यता आहे. तीन पक्षांची मिळून २४ अतिरिक्त मते महाविकास आघाडीकडे असली, तरी त्यावरची १८ मते सहाव्या जागेचा निकाल फिरवू शकतात.

Share