साहेब तुम्हीच अस वागलात तर कस चालायचं?

औरंगाबाद : आपण अनेक चित्रपटांमध्ये बघतो राजकारणी लोक सुड(बदला) घेण्यासाठी आपल्या विरोधकांना अडकविण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. त्यांच्याविरोधात षडयंत्र रचून पोलीस आणि कोर्टाच्या चक्रात अडकवितात. परंतू एका पोलीसानेच असे कृत्य केले तर यापेक्षा दुर्दैव आणखी काय असणार. आता अशीच घटना औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात घडली आहे. एका पोलीस अंमलदाराने जुन्या वादाचा सुड(बदला) घेण्यासाठी किराणा दुकानदाराला गांजा विक्रीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्जुन शेषराव राठोड (वय.३५, रा.हिरापुर फुलंब्री) असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. तो फुलंब्री पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

अंमलदार अर्जुन राठोड यांचे फुलंब्रीतील किराणा दुकानदार दादासाहेब मोरे यांच्याशी जुने वाद होते. या वादाचा सुड(बदला) त्यांना घ्यायचा होता. म्हणून त्यांनी आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने मोरे यांना अडकविण्याची योजना आखली आणि यांच्यापैकी एकाने गांजाने भरलेली बॅग २६ मे रोजी मोरे यांच्या नकळत दुकानात ठेवली. आणि दुसऱ्याच दिवशी २७ मे रोजी मोरे यांच्या दुकानावर पोलीसांनी धाड टाकली. दुकानात गांजाची बॅग सापडल्याने मोरे यांच्यावर गांजा विक्री केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटकही झाली. आणि राठोड यांची सुड घेण्याची योजना देखील यशस्वी झाली.

नंतर मोरे यांची पोलीस चौकशी सुरु झाली. यावेळी आपण गांजा विक्री करत नसल्याचं मोरे यांनी पोलीसांना सांगितलं. परंतू प्रत्येक आरोपी पकडल्या गेल्यावर असेच म्हणतो म्हणून पोलीसांनी अगोदर त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. अखेर दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि या सर्व घटनेत काहीतरी काळबेर असल्याचा संशय वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आला. ज्या बॅगमध्ये गांजा मिळाला ती बॅग एक व्यक्ती बाहेरुन आणून मोरे यांच्या नकळत दुकानात ठेवत असल्याच या सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पोलीसांनी त्या व्यक्तीचा शोध लावला आणि चौकशी केली. तेव्हा हा सगळा कट पोलीस अंमलदार अर्जुन राठोड यांनी सुडाच्या भावनेतून रचल्याचंं स्पष्ट झालं.

मोरे यांच्या दुकानात गांजाची बॅग ठेवताना एक व्यक्ती

पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी या घटनेची दखल घेत अर्जुन राठोड याच्यासह त्याचे तीन साथीदार सचिन डोंगरे, विशाल फाजगे आणि राहुल दहिहंडे यांना तात्काळ अटक केली. तर दुकानदार मोरे यांना मुक्त केले आहे.   आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल अर्जुन राठोड याला निलंबित करणार असल्याचे सांगितले. तसेच यापूर्वीदेखील राठोड याने असे कृत्य केले आहे का, यासाठी त्याचे जुने रेकॉर्ड तपासण्याचे काम पोलीसांतर्फे सध्या सुरु आहे. परंतू कायद्याचे रक्षक असलेल्या पोलीसांनीच असे कृत्य केले तर सर्वसामान्यांनी विश्वास कोणावर ठेवायचा हाच प्रश्न पडतो.

 

 

 

 

 

Share