मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली उद्योगपती रतन टाटांची भेट

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी रतन टाटा यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

रतन टाटा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांची तब्येत ठीक आहे. निर्णयांच्या स्थगितीबाबत यावेळी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, जी कामं ठाकरे सरकारच्या काळात शेवटच्या काळात घाईत मंजूर झाली त्यांना स्थगिती दिली. अत्यावश्यक कामांना स्थगिती नाही. सरकार बदललं म्हणून लोकविकासाची काम कुठलीही रद्द होणार नाहीत. अत्यावश्यक जी कामं आहेत ती रद्द होणार नाहीत, चुकीच्या पद्धतीनं जी कामं झाली त्यावर मात्र नक्की विचार केला जाईल. घाईघाईने केलेली काम आहेत त्यांना स्थगिती दिली आहे. अधिकाऱ्यांचा काहीही प्रश्न नाही, माझी त्यांच्याशी बैठक झाली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृतीचे कारण दिले असले तरी राज्यात उद्योगधंदे वाढवण्याबाबत टाटांसोबत चर्चा झाल्याचे समजते. मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. सक्रिय राजकारणापासून अनेक वर्ष दूर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे यांनी कालच मुख्यमंत्री शिंदे यांची यांची सह्याद्री अतिथीगृहात जाऊन भेट घेतली. स्मिता ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

Share