मुंबई : शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी १ वाजता राज्यातील शिक्षकांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधणार आहेत. यावेळी कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी असणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘वर्षा’ निवासस्थानातून दु. १ वाजल्यापासून दृकश्राव्य प्रणालीद्वारे राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाकडून राज्यातील शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना संकटानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षाची जून महिन्यात नियमितपणे सुरुवात झाली आहे. अद्यापही शिक्षण सुरळीत सुरू आहे. त्यातच केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्दे आणि नवी दिशा यावर मुख्यमंत्री या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. या संवादाचे मुख्यमंत्री सचिवालयाच्या समाज माध्यमांवरून थेट प्रसारण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.