विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी- विरोधकांमध्ये धक्काबुक्की

मुंबई : राज्य विधिमंडळ पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाली. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या चार दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केलेल्या घोषणाबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘आले रे आले गद्दार आले’,’५० खोक्के एकदम ओक्के’, ‘गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो चले गुवाहाटी’, अशा एकापेक्षा एक झोंबणाऱ्या घोषणांनी महाविकास आघाडीने शिंदे गट आणि भाजपला जेरीस आणले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी होताना दिसत होते. त्यामुळे आता अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी भाजप-शिंदे गटाने आपली रणनीती बदलल्याचे दिसत आहे.

महाविकास आघाडीच्या आमदारांप्रमाणेच बुधवारी भाजपचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या देऊन बसले होते. या आमदारांनी महाविकास आघाडीच्या ‘५० खोके-ओक्के’ला चोख प्रत्युत्तर दिले. भाजपच्या या आमदारांकडून बॅनर्स झळकावण्यात आले. यावेळी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनीही अनेक घोषण दिल्या. ‘बीएमसीचे खोके, मातोश्रीचे ओके’, ‘स्थायी समितीचे खोके, मातोश्री ओके’, ‘सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके’, अशा घोषणांनी सत्ताधाऱ्यांनी हा परिसर दणाणून सोडला होता.

Share