माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.  देशमुखांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने १२ डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, सीबीआयला या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी देशमुखांच्या सुटकेच्या आदेशाची दहा दिवस अंमलबजावणी न करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, देशमुखांच्या सुटकेच्या आदेशाला देण्यात आलेल्या स्थगितीची मुदत आज ( २७ नोव्हेंबर ) संपणार होती. याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी पार पडली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत अनिल देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली. मात्र, सीबीआयची ही मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे उद्याच अनिल देशमुखांची ऑर्थर रोड कारागृहातून सुटका होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

काय होतं प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून १०० कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने तपास सुरु केला आणि त्यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर चौकशीअंती अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई झाली. आता तब्बल १ वर्षांने अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Share