मुंबई : पाहता पाहता गणेशोत्सवाचा दिवस उजाडला आणि दीड दिवसांच्या बाप्पांची निरोप घेण्याचीही वेळ जवळ आली. काल गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरोघरी आणि सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर आज दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्यात येणार आहे.
घरी आलेला, सर्वांचाच लाडका पाहुणा दीड दिवसाचा पाहुणचार घेऊन आता आपल्या गावी पुन्हा जाणार आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’च्या गजरात घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात येत आहे. या विसर्जन सोहळ्यासाठी मुंबईत सर्व चौपाट्यांवर कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच विसर्जन होत आहे. यासाठी मुंबईतल्या ठिकठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे. वरळीतील जांबोरी मैदान येथे मुंबई महानगरपालिका आणि वरळी सागरी कोळी महोत्सव समितीच्यावतीने कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत. यंदा येथील दोन कृत्रिम तलाव हे शाडूच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्यासोबतच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन व्हावं यासाठी अमोनियम नायट्रेटचा प्रयोग याठिकाणी करण्यात आला आहे.