‘टिव टिव करत उंदीर महाराष्ट्रात फिरतोय,’ केंद्रीय मंत्री नारायण राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. टीव टीव करत एक उंदीर फिरतोय महाराष्ट्रभर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने फिरतोय, अशी टीका त्यांनी केली.

शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यात दौरा करण्याचं ठरवलं होता. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, असा दौरा केला देखील होता. या दौऱ्यावरुन विरोधकांनी टीकादेखील केली होती. दरम्यान, आता नारायण राणे यांनीही आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरुन त्यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात ठाकरेंचा वारस म्हणजे शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही, उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचे काही गुण आहेत का ? जे घडलं ते योग्य घडलं. मी पण बंड केलं होतं. माझ्या बंड करण्यामागे खूप कारणं आहेत. ते करावं लागतं, जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही त्याला काय करणार ? खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे. यंदा दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेचाच होणार, उद्धव ठाकरेंना विचार द्यायला काय आहे, त्याच्याकडे कोणते विचार आहेत? ते काय बोलणार? अशी विखारी टीका नारायण राणे यांनी ठाकरेंवर केली.

Share