भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांना पुत्रशोक

लातूर : भाजप नेते आणि माजी आमदार पाशा पटेल यांचे पुत्र अ‍ॅड. हसन पाशा पटेल यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. लातूर येथे राहत्या घरी त्यांचे निधन झाले. वयाच्या ३८ व्या वर्षी हसन पटेल यांचे निधन झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.

ॲड. हसन पटेल यांना मागील काही दिवसांपासून ह्‌दयाच्या विकाराचा त्रास होत होता. त्यांच्यावर लातूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी (ता. २५ ऑगस्ट) रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावल्याने आज पहाटे चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. हसन पटेल यांचे कमी वयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पाशा पटेल यांचे मूळगाव असलेल्या औसा तालुक्यातील लोदगा येथे आज दुपारी दोनच्या सुमारास हसन पटेल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडिल आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

कोण आहेत पाशा पटेल?

पाशा पटेल हे शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत कार्यरत होते. या संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेल्या पाशा पटेल यांना त्यावेळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षात आणले. शेतकरी चळवळीतील भाजपचा मुस्लिम चेहरा दाखवण्यासाठी त्यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली. मात्र मुंडे यांच्या निधनानंतर बहुजन, अल्पसंख्यांक समाजात भाजपचे काम वाढवण्याचा प्रयत्न करणारे पाशा पटेल यांना भाजपने सध्या अडगळीत टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Share