शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र निवडणुका लढवणार

मुंबई : राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा करण्यात आली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतोय. फक्त महाराष्ट्रातच नाही तर प्रादेशिक पक्ष चिरडून टाकणं यालाच लोकशाही मानणारे लोकं बेताल वागत आहेत. येत्या काही काळात सुप्रीम कोर्टात जो लढा सुरु आहे, हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचाच आहे असे नाही. देशात लोकशाही असेल का बेबंदशाही, याचा निकाल लागणार आहे. असो. पण आपण संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो पाहिजेत. प्रादेशिक अस्मिता टिकावण्यासाठी एकत्र आलो पाहिजेत. आपण सगळे शिवप्रेमी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ आपण सगळे एकच आहोत. मराठी माणसाला दुहीचा शाप गाढत आलाय. या शापालाच आपण गाढून टाकू, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्रात जे काही घडवलं किंवा बिघडवलंय ही महाराष्ट्राची ओळख नाही. ही शिवरायांच्या, संभाजीराजांच्या महाराष्ट्राची ओळख नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तर तसं वागायला हवं. तसं वागायचं नाही आणि दाखले देताना शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे दाखले द्यायचे. हा महाराष्ट्र देशाला मार्गदर्शक ठरेल, असा आपण घडवू. त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत आलेला आहात म्हणून मी तुमचं स्वागत करतो, असं यावेळी उद्धव ठाकरे संभाजी ब्रिगेडला उद्देशून म्हणाले.

Share