अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करा; राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सध्या वेग आला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपच्या मुरजी पटेल यांच्याकडून आपापली संपूर्ण ताकद पणाला लावून प्रचार सुरु आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची भूमिका काय असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. असे असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीसंदर्भात भाजपला आवाहन केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून भाजपाने ही निवडणूक लढवू येणे, अशी विनंती केली आहे.

राज ठाकरेचं फडणवीसांना पत्र 

श्री. देवेंद्र फडणवीस

उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र!

एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणास लिहितो आहे.

आमदार के. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्यानं के. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.

माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावे..

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझे मन सांगत.

अस करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.

आपला मित्र,

राज ठाकरे
Share