मुंबई : कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळातच देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने केल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मोदींनी केलेल्या या विधानानंतर आता महाराष्ट्र काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केलाय असं सांगत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच भाजप विरोधात उद्यापासून आंदोलन करण्यात येणार असल्याचंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
शिवछत्रपती च्या महाराष्ट्राला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी कडून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर "पंतप्रधान माफी मांगो" आणि निषेधाचे फलक दाखवून आंदोलन करणार. pic.twitter.com/yhmVm1Obid
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 8, 2022
नाना पटोले यांनी आज गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजप विरोधात माफी मागा’आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे. नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान यांचं भाषण काल झालं आणि आजही झालं. पंतप्रधान यांनी शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला. भाजपचे प्रचारक म्हणून मोदी वागत असतील तर त्या पदाची गरिमा घालवत आहेत. भाजप आणि पंतप्रधान यांनी माफी मागितली पाहिजे. भाजपच्या कार्यालयासमोर आम्ही माफी मागा असे फलक घेऊन उद्या उभं राहणार आहोत. उद्यापासून हे आंदोलन भाजप कार्यालयांबाहेर करण्यात येईल असं नाना पटोले यांनी दिली आहे.