विधान परिषदेसाठी काँग्रेसची यादी जाहीर; जगताप, हंडोरेंना उमेदवारी

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली. भाजपने या निवडणुकीसाठी उमेदवारांची नाव जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना‌ उमेदवारी दिली आहे.

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशनुसार या दोघांच्या नावांना मान्यता दिली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी या माहितेचे परिपत्रक काढले आहे.

दरम्यान काँग्रेसकडून मोहन जोशी, सचिन सावंत, अतुल लोंढे, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन संकपाळ यांच्या नावांची चर्चा होती. अखेर दिल्लीतून जगताप आणि हंडोरे यांच्या नावं निश्चित करण्यात आलं आहे.

भाजपने कोणाला दिली उमेदवारी?

भाजपने काही वेळापूर्वी विधानपरिषद निवडणूक उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड या नावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांच्यासह इतर नेत्यांचा पत्ता कट झाला आहे.

Share