राज्यसभा निवडणुकीत पक्षादेशाप्रमाणे मतदान करा : शिवसेनेच्या आमदारांना सूचना

मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ६ जागांसाठी येत्या शुक्रवारी १० जूनला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आपले आमदार फुटू नयेत यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि विरोधी भाजपकडून काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या आदेशाप्रमाणे मतदान करण्याच्या सूचना या व्हिपद्वारे आमदारांना करण्यात आल्या आहेत.

राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांसाठी हा व्हिप जारी केला आहे. राज्यसभा निवडणुकीचे मतदान शुक्रवारी, दिनांक १० जून २०२२ रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला, विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. सदर निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून सदस्यांनी शुक्रवार १० जून २०२२ रोजी शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष २१४, विधानभवन, मुंबई या दालनात मतदानाबाबतच्या सूचना घेण्याकरिता सकाळी ८ वाजता उपस्थित रहावे. आपल्याला देण्यात येणाऱ्या निर्देश व सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करायचे आहे, असे शिवसेनेच्या व्हिपमध्ये नमूद करण्यात आले आहे.

६ जागांसाठी ७ उमेदवार निवडणूक रिंगणात
राज्यसभेच्या सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपकडून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक, शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, कॉँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी हे सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेना, भाजपमध्ये जोरदार चुरस आहे. अपक्ष आमदारांना, लहान पक्षांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. त्यासोबतच आपल्या आमदारांची मते फुटू नयेत यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपने काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेच्या आमदारांचा मुक्काम ट्रायडंट हॉटेलमध्ये
सध्या शिवसेनेच्या आमदारांचा मुक्काम मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आहे. आमदारांची फोडाफोडी होऊ नये यासाठी शिवसेनेकडून खबरदारी घेतली जात आहे. काल ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, शिवसेना नेते संजय राऊत, खा. अनिल देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, खा. अरविंद सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार उपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना संबोधित केले. राज्यात अनेक वर्षांनी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याची आपली परंपरा होती. मात्र, भाजपमुळे ती यंदा मोडीत निघाली, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला लक्ष्य केले. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी ज्याप्रकारे भाजपला नेस्तनाबूत केले, तेच आपल्याला करावे  लागणार आहे. महाविकास आघाडी भक्कम आहे. आपले चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेची निवडणूकदेखील जिंकू. त्यानंतर पुन्हा आपण भेटू आणि सेलिब्रेशन करू, असे  मुख्यमंत्री ठाकरे याप्रसंगी म्हणाले.

Share