भिडेवाडा स्मारक उभारणीस २ महिन्यांत सुरुवात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींवर मात करून स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षण देण्याचे महान कार्य केले. राज्य तसेच  देशातील महिला शक्ती आज विविध क्षेत्रात पुढे येत आहे. त्यामागे त्यांचीच प्रेरणा आहे. पुणे  येथील  भिडे वाडा येथे  स्मारक उभारणीबाबत सर्व बाबींची पूर्तता करुन दोन महिन्यात स्मारकाचे भूमिपूजन केले जाईल. या स्मारकाच्या माध्यमातून अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,सावित्रीबाईंना घडविण्यात नायगावचा मोठा वाटा आहे. त्यांचा वाडा हा ऐतिहासिक ठेवा आहे. फुले दांपत्यामुळे आज महिला विविध क्षेत्रात काम करत आहेत.स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेला स्त्री सक्षमीकरणाचा जागर जगाला आदर्शवत आहे. अनेक अडचणींना तोंड देत सावित्रीबाई फुले  यांनी महिलांना शिक्षण देण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे राज्य आणि देशातील स्त्री शक्ती आज विविध क्षेत्रात पुढे येत आहे. आज राष्ट्रपती पदावरही महिला विराजमान आहेत.

सावित्रीबाई फुले यांची  प्रेरणा घेऊनच राज्य शासन काम करीत आहे. इतर मागास प्रवर्गातील मुले व मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. वसतिगृहांसाठी जागा उपलब्ध करुन घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Share