स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान विसरलो नाही आणि विसरता कामा नये – छगन भुजबळ

नाशिक : देशाची अतिशय महत्वपूर्ण राज्यघटना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली. या घटनेने संपूर्ण देश एकसंघ बांधला गेला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तयार केलेल्या या घटनेवर महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळे या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी या महापुरुषांचे विचार अतिशय महत्वपूर्ण आहे. या घटनेची पायमल्ली होता कामा नये त्यासाठी आपली राज्यघटना शाबूत ठेवण्याची जबाबदारी देशातील प्रत्येक नागरिकाची आहे असे प्रतिपादन माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी भवन कार्यालय नाशिक येथे आयोजित ध्वजारोहण माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याला आज ७५ वर्ष पूर्ण होत असून अनेक वीरांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याची जपवणूक करण्याची आपल्याला आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, भगतसिंग, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक क्रांतीकारकांचे अतिशय महत्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल यांनी देशाची सूत्र आपल्या हाती घेऊन पंचवार्षिक योजनेची घोषणा केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीचे पाऊल पडले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने संशोधन शेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली. अंतराळ क्षेत्रात विविध मोहिमा यशस्वी केल्या. तसेच विविध क्षेत्रात प्रगती साधली. त्यामुळे आपला देश हा विकासाच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यावर पोहचला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांच्यासह अनेक नेत्यांचे देशाच्या विकासात अतिशय महत्वाचे योगदान दिले. मात्र काही लोकांकडून हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, देशाचा पोशिंदा असलेला देशातील सर्व शेतकरी वर्ग आज अडचणीत आला आहे. राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठ संकट कोसळले असून या शेतकऱ्यांना पुन्हा उभ करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्य सैनिक व कुटुंबियांचा सन्मान
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. आपल्याला मिळालेलं हे स्वातंत्र्य अनेक वीरांच्या बलिदानातून मिळालेले असून या स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आपण विसरलो नाही आणि विसरता देखील कामा नये असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने भुजबळ फार्म येथील कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त नाशिक शहरातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात होते. या स्वातंत्र्य सैनिक व कुटुंबियांचा सन्मान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला.

Share