कोरोना अजून संपलेला नाही, राज्यांनी सतर्क रहावे : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबांधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज राज्यांची आढावा बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत देशातील कोरोना संसर्गाची स्थिती, लसीकरण याचा आढावा घेण्यात आला. कोरोना अजून संपलेला नाही. कोरोनाबाबत सरकारने आखलेल्या नियमांची आणि लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन मांडवीय यांनी सर्व राज्यांना केले. शाळेत जाणाऱ्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यावर लक्ष द्यावे. तसेच कोरोनाचा बूस्टर डोस ज्येष्ठ नागरिकांना मिळेल याकडे लक्ष द्यावे, अश सूचनाही मनसुख मांडविया यांनी राज्यांना केल्या.

या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील सर्व राज्यांतील आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याबरोबरच कोरोना विषाणूच्या जनुकीय क्रमानिर्धारणाकडेही (जिनोम सिक्वेन्सिंग) लक्ष ठेवावे, असे आवाहन मांडवीय यांनी यावेळी केले. विशेषतः काही राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आवश्यक पावले उचलण्याच्या सूचना मांडवीय यांनी केल्या. यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना निर्बंध जरी हटवण्यात आले असले तरी जे कोरोनाबाबतचे नियम लागू आहेत त्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्यात यावे. विशेषतः परदेशातून येणाऱ्या व्यक्तींच्या तपासण्या, आरोग्य सुविधा, लसीकरण याकडे लक्ष द्या, असे मांडवीय यांनी स्पष्ट केले.

हर घर दस्तक मोहीम, १२ ते १७ वयोगटाचे लसीकरण, १८ ते ५९ वयोगटासाठी बूस्टर डोस अर्थात वर्धक लस, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण यावर भर द्यावा, अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना या बैठकीच्या माध्यमातून केल्या. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लस या वाया जाणार नाही याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

 

Share