औरंगाबाद : शहर गुन्हे शाखा पोलीसांनी धाड टाकत अवैध गुटखा विक्री, तंबाखू विक्री करणाऱ्यांना अटक करीत तब्बल २१ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेख हबीब शेख मदन, शेख यासीन शेख हत्तू आणि मोहसीन मुमताज खान असे अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांना माहिती मिळाली की, आरोपी शेख हबीब शेख मदन याने आपल्या मुकुंदवाडीतील घरात प्रतिबंधित तंबाखू आणि गुटख्याचा साठा केला आहे. यावरून त्यांनी सदर ठिकाणी छापा मारला असता त्यांना अवैध रॉयल ७१७ तंबाखू आणि हिरा मसाला याचा मोठा साठा आढळून आला. पोलीसांनी तात्काळ सर्व मुद्देमाल जप्त केला. तसेच याच्या वाहतूकीसाठी वापरली जाणारी एक चारचाकी देखील पोलीसांनी जप्त केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. याठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.