“विभास साठेंच्या जीवाला धोका”, त्यांचा ‘मनसुख’ होण्याची भीती -सोमय्या

मुंबईः  राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने २६ मे रोजी त्यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणी छापा मारला होता. यामध्ये दापोलीतील रिसॉर्टची कथित विक्री परब यांना करणारे विभास साठे यांच्या निवासस्थान, कार्यालयाचाही समावेश यात होता. तर परब यांच्यावरील कथित रिसॉर्ट प्रकरणी कारवाई सुरू झाल्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत विभास साठे यांच्या जिवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी अशी विनंती मी महासंचालक यांना केली असल्याचं सांगत सोमय्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहीले आहे.

किरीट सोमय्या यांनी म्हटले की, राज्याचे मंत्री अनिल परब रिसॉर्ट घोटाळाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. परब यांनी विभास साठे कडून जमीन घेतली होती. विभास साठे यांचे “मनसुख हिरण” होऊ नये. विभास साठे यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी अशी विनंती मी महासंचालक यांना केली असल्याचे सोमय्या यांनी म्हटले.

पत्रात काय म्हटलं आहे 
किरीट सोमय्यांनी महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. या घोटाळ्यासंबंधी अनेक तपास यंत्रणा, संस्थांनी तसंच पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी अनिल परब आणि त्यांच्या साई रिसॉर्ट एनएक्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल परब यांनी २०१७ मध्ये विभास साठे यांच्याकडून दापोली येथील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील जमीन घेतली व फसवणूक करत रिसॉर्ट बांधला,” असं सोमय्यांनी पत्रात सांगितलं आहे.

पुढे ते म्हणतात की, “अनिल परब या घोटाळ्यामुळे अडचणीत आले असून आम्हाला भीती वाटते की, अनिल परब हे विभास साठेंवर दडपण आणणार. विभास साठे यांचे मनसुख हिरेन होऊ नये हे पाहणे महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी आहे. विभास साठे यांच्या जीवाला धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी. त्यांचा मनसुख हिरेन होऊ नये हे पहावे ही विनंती”.

Share