दीपक केसरकरांचा शरद पवारांन बदल खुलासा

मुंबईः   एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी टिका केली.  आता त्यावर केसरकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मी कधीही अपशब्द काढले नाहीत. माझ्या जीवनाच्या जडण घडणीत ज्या मोठ्या नेत्यांचा वाटा त्यापैकी एक शरद पवार असल्याचे वक्तव्य केसरकर यांनी केले आहे. आवश्यकता असेल तर मी पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांची दिलगीरी व्यक्त करेल असेही केसरकर म्हणाले.

केसरकर काय म्हणाले होते ?,  “मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत. मी राष्ट्रवादीत असताना ते विश्वासात घेऊन सांगायचे”, असं केसरकरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं होतं. “शरद पवारांनीच मला, जरी मी नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवलेली नाही, असं सांगितलं होतं. हा निश्चितच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती,” असा दावा केसरकरांनी केला होता.

“त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. ‘मातोश्री’ कधी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही शरद पवारांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना हे कधीही मान्य नव्हतं,” असंही केसरकर म्हणाले होते.

दरम्यान, या वक्तव्यांवरून टीका सुरू झाल्यानंतर आज त्यावर केसकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी कधीही शरद पवारांविषयी अनुद्गार काढलेले नाहीत. माझ्या जडणघडणीत ज्या नेत्यांचा मोठा वाटा आहे, त्यापैकी एक शरद पवार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल एकही अपशब्द माझ्या तोंडून येऊ शकत नाही. ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आदर आहे. जर त्यांच्याबद्दल माझ्या तोंडून चुकून एखादा शब्द निघाला असेल, तर त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो आणि गरज पडली, तर शरद पवारांच्या घरी जाऊन मी दिलगिरी व्यक्त करेन”, असं केसरकर म्हणाले.

Share