दीपाली सय्यद यांचं पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन?

सांगली : अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर त्यांच्याच माजी स्वीय सहाय्यकाने गंभीर आरोप केले आहेत. दीपाली सय्यद यांनी अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलाय सामुदायीक विवाहाच्या नावाखाली बोगस लग्न लावली असाही आरोप देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

सामुदायिक विवाह सोहळ्याच्या नावाखाली ‘दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कोट्यवधी रुपये लाटले आहेत. विशेष म्हणजे राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत ही बोगस लग्न लावण्यात आल्याचा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांच्यावर राज्यपाल एवढे मेहेरबान का, दीपाली यांच्याकडे कोटयवधी रुपये कुठून आले? याची चौकशी करण्याची ‘मागणी शिंदे यांनी सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत ९ सप्टेंबर २०२१ रोजी सामुदायिक विवाह सोहळा झाला. यात २०१६ मध्ये लग्न झालेल्या दाम्पत्याचे पुन्हा या चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत लग्न लावले. या दाम्पत्याला २०१८ मध्ये मूलही झाले असल्याचे उदाहरण देत कोश्यारी आणि दीपाली सय्यद या दोघांनी मिळून अशी अनेकांची बोगस लग्ने लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करा
स्वतःच्याच नावे असलेल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दीपाली यांनी हजारो कोटींचे वाटप केले. मात्र या ट्रस्टचा ऑडिट रिपोर्ट पाहिला तर खात्यात 9182 रुपये आढळले. त्यामुळे बाकीची रक्कम दीपाली यांनी कोठून आणली आणि कोठून दिली, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दीपाली सय्यद यांच्या नावे चालविण्यात चॅरिटेबल ट्रस्टची आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून आठ दिवसांत चौकशी करावी, चौकशी झाली नाही तर उपमुख्यमंत्र्यांच्या घरा समोर आत्मदहन करेन, असा इशारा भाऊसाहेब शिंदे यांनी दिला.

Share