भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेले नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना फाजिलनगर मतदारसंघातून पराभवाला सामोर जाव लागलं आहे. भाजपच्या सुरेंद्र कुमार कुशवाहा यांनी त्यांचा पराभव केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का देत योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षामध्ये अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.
भाजपच्या सुरेंद्र कुमार कुशवाहा यांनी समाजवादी पक्षाच्या स्वामी प्रसाद मौर्य यांचा दहा हजाराहून अधिक मतांनी पराभव केला आहे. हा स्वामी प्रसाद मौर्य आणि समाजवादी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत आलेल्या कलानुसार, भाजपने 274 जागांवर आघाडी घेतली असून समाजवादी पक्ष 123 जागांवर पुढे आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा ‘योगी राज’ येणार हे स्पष्ट झालं आहे
कोण आहेत स्वामी प्रसाद मौर्य ?
स्वामी प्रसाद मौर्य हे पाच निवडणूकांपासून आमदार होते. त्यांची राजकीय कारकीर्द तब्बल 40 वर्षांची आहे. सन 2016 पर्यंत ते मायवतींसोबत बसपाचा चेहरा म्हणून होते. 2017 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा विधानसभेत निवडून गेले. स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशमधील मागास समाजाचा मोठा चेहरा समजले जातात. त्यामुळे त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं. आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर स्वामी प्रसाद मौर्यांनी भाजपला रामराम ठोकत सपाच्या सायकलीवर सवार झाले होते . स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपद सोडलं, पक्षही सोडला. पण त्यांची मुलगी संघमित्रा मौर्य या भाजपच्या खासदार आहेत. त्या मात्र भाजपमध्येत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.