पंजाबः देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यूपीसह गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपला निर्णायक आघाडी मिळालीय, तर पंजाबमध्ये आपने सत्ता मिळवलीय. तर पंजाबचे काँग्रेसचे मावळते मुख्यमंत्री चरणजीत चन्नी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पराभवाला तोंड द्यावे लागले.
चरणजीत चन्नी यांचा पराभव
मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती. या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला आहे.चन्नी यांना चमकौर साहिब आणि भदौर या दोन्ही जागेवर पराभव झाला आहे. भदौर मतदारसंघातून आपच्या लाभ सिंह यांनी चरणजीत चन्नी यांचा पराभव केला आहे. ते फक्त १२ वी पास आहेत. तर चमकौर साहिब या मतदार संघातून डॉक्टर चरणजीत सिंह यांनी काँग्रेसच्या चरणजीत सिंह यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या चरणजीत सिंह यांनी तीन वेळा निवडणूक जिंकली आहे. २००७ मध्ये चन्नी यांनी अपक्ष निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०१२ आमि २०१७ मध्ये काँग्रेसकडून त्यांनी विजय मिळवला होता. पण आता चरणजीत सिंह यांना दोन्ही जागांवरुन पराभव स्विकारावा लागला आहे.
उपमुख्यमंत्री ओम प्रकाश यांचा पराभव
उपमुख्यमंत्री ओम प्रकाश सोनी यांचाही पराभव झाला आहे. अमृतसर सेंट्रल या विधानसभ मतदार संघातून अजय गुप्ता यांनी ओम प्रकाश सोनी यांचा पराभव केला आहे. ओम प्रकाश सोनी अमृतसह सेंट्रलमधून तीन वेळा आमदार राहिले आहेत. २००७ ,२०१२ आणि २०१७ मध्ये ओम प्रकाश सोनी यांनी विजय मिळवला होता. मात्र, आता आपच्या त्सुनामीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांचा पराभव
नवज्योत सिंग सिद्धू हे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्येही होते. पण त्यांना आपली जागा गमवावी लागली. अमृतसर पूर्व मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवार जीवन ज्योती कौर यांनी त्यांचा पराभव केला आहे.