राज्यातील जनतेच्या बँक खात्यात ३००० रुपयांची ‘दिवाळी भेट’ जमा करा – नाना पटोले

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने रेशनकार्ड धारकांना दिवाळीसाठी १०० रुपयामध्ये रेशन दुकानातून एक किलो चणाडाळ, साखर, रवा, व एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारची ही दिवाळी भेट अत्यंत तुटपुंजी आहे. सरकारने महागाईचा विचार करून प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यातच तीन हजार रुपये दिवाळी भेट जमा करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात पटोले म्हणाले, राज्यातील जनतेची दिवाळी गोड करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. विशेषतः महागाई प्रचंड वाढलेली आहे, जीवनावश्यक वस्तूसह किराणा माल घेणेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे, अशा परिस्थीतीत ज्या चार वस्तू १०० रुपयात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या एका कुटुंबासाठी अपुऱ्या व अत्यंत तुटपुंज्या आहेत.

राज्यातील जनतेची दिवाळी गोड व्हावी असे आपणास वाटत असेल तर अतिसंवेदनशील मुख्यमंत्री या नात्याने ३ हजार रुपये रेशनकार्डधारकांच्या थेट बँक खात्यात जमा करून सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड करावी, असे म्हटले आहे.

Share