देहू-आळंदीचा विकास, इंद्रायणीच्या स्वच्छतेला प्राधान्य देऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : वारकरी संप्रदाय ही मोठी शक्ती असून या संप्रदायाने भजन व कीर्तनाच्या माध्यमातून मानवकल्याण आणि विश्वशांतीचा संदेश दिला. मानवाला सद्विचार देणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मृदंग ज्ञान शिक्षण संस्था आळंदी आयोजित संत दासोपंत स्वामी आळंदीकर यांचा गुरुपूजन सोहळा, संस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा आणि मृदंग दिंडी महोत्सव प्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राला महान संत परपरा आणि वारकरी परंपरा लाभली आहे. ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराजांसारख्या महान संतांची परंपरा हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. अन्य कुठल्याही प्रांताला हे भाग्य लाभले नसेल. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत. वारकरी परंपरेत भजन, कीर्तनाला मोठे स्थान आहे, ही एक ज्ञान आराधना असून त्यात भक्ती आणि ज्ञानोपासनेचा संगम आहे. विश्वशांती आणि मानवकल्याणाचा संदेश त्याद्वारे दिला जातो.

पंढरपूरसह देहू-आळंदीच्या विकासावरही भर

मुख्यमंत्री पद वारकरी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, शोषित- पीडित लोकांच्या कल्याणासाठी वापरून राज्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले,  पंढरपूरचा विशेष कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वारकऱ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात आणि परिसर स्वच्छ राहावा यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. देहू-आळंदीचादेखील याच पद्धतीने विकास करायचा आहे. याठिकाणी लाखो भाविक येतात. येथे येणाऱ्या वारकऱ्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यात येतील. इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी प्रशासनाला सूचना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

Share